पोटच्या गोळ्याकडून मृत्यूनंतरही पित्याची उपेक्षा

Foto
'वेळ नाही' म्हणत मुलाने नाकारले अंत्यसंस्कार; पोलिसी कारवाईच्या इशाऱ्यानंतर मुलाची हजेरी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) आयुष्यभर मुलाला लहानाचे मोठे करणाऱ्या जन्मदात्या पित्याच्या मृत्यूनंतरही त्यांची उपेक्षा झाल्याचा संतापजनक प्रकार शहरात समोर आला. 'आम्हाला वेळ नाही, तुम्हीच अंत्यसंस्कार उरकून घ्या,' असे सांगत एका मुलाने ८० वर्षीय वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अखेर वृद्धाश्रम चालकांनी पोलिसांत तक्रार करण्याची तंबी दिल्यानंतर संबंधित मुलगा अंत्यसंस्कारासाठी हजर झाला.
फेब्रुवारीमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात
एआय फोटो
८० वर्षीय आजोबा अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त अवस्थेत एका तरुणीला आढळून आले होते. तिने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी मिळाली; मात्र, त्यांना घरी नेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
त्यामुळे त्यांची रवानगी दैवत वृद्धाश्रमात करण्यात आली.
लग्न होऊ द्या; नंतर बघू
दैवत वृद्धाश्रमाच्या संचालिका उमा तुपे यांनी आजोबांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रयत्नांनंतर त्यांचा मुलगा आणि सून यांचा ठावठिकाणा लागला. मात्र, वडिलांना घरी नेण्याऐवजी मुलाने, 'आमच्या घरात लवकरच लग्न आहे. घर छोटे पडेल. लग्न होऊ द्या, त्यानंतर बघू, असे सांगत त्यांना घरी नेण्यास नकार दिला. त्यामुळे आजोबांना वृद्धाश्रमातच राहावे लागले.
अंत्यसंस्कारस वेळ नाही !
अर्धांगवायूचा आजार बळावल्याने आणि दीर्घकाळ एकाच जागी पडून राहिल्याने रविवारी सकाळी आजोबांची प्राणज्योत मालवली. उमा तुपे यांनी मुलाला फोन करून मृत्यूची माहिती दिली आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र, तुम्हीच अंत्यसंस्कार आटोपून घ्या. आम्हाला वेळ नाही आणि जमणारही नाही,' असे उत्तर मुलाने दिल्याचे सांगण्यात आले.
पोलिसी कारवाईच्या इशाऱ्याने धावपळ
मुलाचे वारंवार नकार देणे आणि विनंती करूनही प्रतिसाद न मिळाल्याने उमा तुपे यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तंबी मिळताच कुटुंबीयांची धावपळ उडाली. काही वेळातच मुलगा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी वृद्धाश्रमात दाखल झाला. संबंधित कुटुंब छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जवळच्या गावात वास्तव्यास असल्याचे समजते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions